Friday, February 18, 2011

घन तमीं शुक्र बघ राज्य करी - भा. रा. तांबे

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
घन तमीं शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना, बघ जरा तरी !

ये बाहेरी अंडे फोडुनि
शुद्ध मोकळ्या वातावरणी
का गुदमरशी आतच कुढुनी ?
रे ! मार भरारी जरा वरी

प्रसवे अवस सुवर्णा अरुणा
उषा प्रसवते अनंत किरणा
पहा कशी ही वाहे करुणा
का बागुल तू रचितोस घरी ?

फूल हसे काट्यांत बघ कसे
काळ्या ढगि बघ तेज रसरसे
तीव्र हिमांतुनि वसंतहि हसे
रे, उघड नयन, कळ पळे दुरी

फूल गळे, फळ गोड जाहले
बीज नुरे, डौलात तरु डुले
तेल जळे, बघ ज्योत पाजळे
का मरणि अमरता ही न खरी ?

मना, वृथा का भीती मरणा ?
दार सुखाचे ते हरि-करुणा !
आई पाही वाट रे मना
पसरोनी बाहु कवळण्या उरी

गीत :भा. रा. तांबे
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : लता मंगेशकर


( Ghan Tami Shukra bagh rajya kari - Bha Ra Tambe )

सूजित काणे यांनी सुचवलेलं गाणं ! सूजित आभार !

No comments:

Post a Comment

Please comment. Your review is very important for me.