Thursday, April 29, 2010

तनमन अमृत बनते ग - सुरेश भट

अमृतमय मी, अमृतमय तू, तनमन अमृत बनते ग;
अमृतमय श्वासात आपुल्या अमृतनभ थरथरते ग!

अमृतमय मौनातच रिमझिम रिमझिमती अमृतधारा;
भिजते माझे अंगअंग, पण अंग तुझेही भिजते ग!

रुधिरातील कल्लोळ हावरा रुधिराताच फिरला विरला;
एकच इवले कातर स्पंदन अंतरात किलबिलते ग!

आत्म्याच्या चांदण्यात अपुल्या हुरहुरत्या हाका घुमती;
जन्माच्या वेलीचे सावध पानपान सळसळते ग!

कायांचा कापूर बंद पण दरवळ बघ तरळत उठला;
स्पर्शाविण स्पर्शांचे वादळ धमन्यातुन भिरभिरते ग!

प्राणाच्याही पार आपुल्या कुठेतरी भेटी घडती;
गडे, मला हे जाणवते अन् तुजलादेखिल कळते ग!

स्वप्नाफुलानी आज शिगोशिग डोळ्यांची परडी भरली;
तुझी नव्हाळी, माझी तगमग... कोण कुणाला खुडते ग?
( Amrutamay mi amrutmay tu , tan man amrut banate ga )

No comments:

Post a Comment

Please comment. Your review is very important for me.