Monday, February 22, 2010

बघ माझी आठवण येते का - सौमित्र

मुसळधार पाऊस खिडकित उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळं पिउन टाक ,
बघ माझी आठवण येते का ?
वारयाने उडणारे पावसाचे थेंब चेहर्यावर घे,
डोळे मिटून घे, तल्लीन हो ,
नाहीच जाणवल काही तर बाहेर पड,
समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच,
पाण्यात पाय बुडवून उभी रहा, वाळू सरकेल पायाखाली,
बघ माझी आठवण येते का?
मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे,
चालत रहा पाऊस थांबेपर्यत,
तो थांबणार नाहीच, शेवटी घरी ये,
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस,
पुन्हा त्याच खिडकीत ये, आता नवर्याची वाट बघत,
बघ माझी आठवण येते का?
दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल,
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल,
तो विचारेल तुला तुझ्या भिजण्याचा कारण,
तू म्हणं घर गळतयं, मग चहा कर, तूही घे ,
तो उठून पंकज उधास लावेल, तू तो बंद कर,
किशोरीच सहेलारे लाव,
बघ माझी आठवण येते का?
मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं,
विजांचा कडकडाट होईल, ढ़गांचा गडगडाट होईल,
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्या शरीराकडे बघ,
बघ माझी आठवण येते का?
यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस,
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर ,
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर ,
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी,
बघ माझी आठवण येते का?

2 comments:

Please comment. Your review is very important for me.